टँकर चालकांनी जादा शुल्क आकारू नये   

आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन

पुणे : पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिकांकडून टँकरची मागणी केली जाते. टँकरने पाणी देताना नागरिकांकडून जादा शुल्क आकारू नका, अशी तंबी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी टँकर चालकांना बुधवारी दिली. टँकर चालकांनी जादा पैशाची मागणी केल्यास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार करा, असे आवाहन आयुक्तांनी केले. 
 
धरणातील उपलब्ध असलेला पाणीसाठा नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून शहरात टँकरची संख्या वाढत आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे पाण्याची गरज भागविण्यासाठी शहरातील काही सोसायट्यांकडून टँकरची मागणी होत असल्याचे निरिक्षण पाणीपुरवठा विभाागील अधिकार्‍यांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी बुधवारी महापालिकेत टँकर चालक मालक असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांना वेठीस धरुन टँकरसाठी वाढीव दर आकारु नये, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. 
 
या बैठकीत संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन टँकर भरुन घेऊन नागरिकांना पोहचविण्याासाठी निश्चित किती खर्च येतो, याची माहिती घेण्यात आली. टँकर भरण्याचे ठिकाण आणि ज्या ठिकाणावरून टँकरची मागणी झालेली आहे. त्यामधील अंतर यावर टँकरचे दर घेतले जातात. नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेत विनाकारण दर आकारु नका, अशा सूचना देण्यात आल्याचे आयुक्त डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या भागात महापालिकेला पाणी देता येत नाही तेथे महापालिकेच्या वतीने मोफत टँकरद्वारे पाणी दिले जाते. मात्र टँकर चालक नागरिकांकडे पैसे मागत असल्याचे काही तक्रारी समोर आल्या आहेत. जे टँकर चालक नागरिकांकडून पैसे मागतील त्याची तक्रार पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे करावी. 
 
आंबेगाव बुद्रुक, नर्‍हे, खराडी या भागातून टँकरसाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची दखल घेत संबधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी दिला. शहरातील टँकरची मागणी आणि त्यासाठी घेतले जाणारे शुल्क याचे पाहणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विहीर तसेच बोअरवेलमधून स्वच्छ पाणी द्या

शहरातील विविध भागातून टँकरची मागणी होत असते. ही गरज खासगी टँकरद्वारे पूर्ण केली जाते. महापालिकेच्या टँकर भरणा केंद्राबरोबरच बोअरवेल तसेच विहिरीमधून पाणी भरुन ते टँकरद्वारे पोहचवले जाते. हे पाणी देताना ते शुद्ध असेल याची खात्री संबधित टँकर चालकांनी आणि मालकांनी करुन त्यानंतरच त्याचे वितरण नागरिकांना करावे, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली. पाणीपुरवठा करताना त्यामध्ये आवश्यक प्रमाणात क्लोरिन टाकण्याच्या सूचनाही भोसले यांनी दिल्या.
 

Related Articles